आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी यूटय़ूबर अलाहाबादीयाविरोधात पोलिसात तक्रार

छोटय़ा पडद्यावरील इंडिया गॉट लेटेंट कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त आणि अश्लील टिपणी करणाऱ्या प्रसिद्ध यूटय़ूबरविरोधात मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. कॉमेडियन समय रैनाचा इंडिया गॉट लेटेंट हा कार्यक्रम चर्चेत असतो. या शोमध्ये यूटय़ूबर आशीष चंचलानी, अपूर्वा मुखिजा, रणवीर अलाहाबादीया हे दिसले होते. नुकतेच यूटय़ूबर रणवीर अलाहाबादीया हा त्या शोमध्ये पाहुणा म्हणून आला होता. तेव्हा त्याने वादग्रस्त आणि आक्षेपार्ह टिपणी केली केली होती. त्यानंतर रणवीरने माफीदेखील मागितली होती. आज दुपारी खार पोलिसांचे पथक खार येथील एका इमारतीत पोहचले. तेथे कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. पोलिसांनी आयोजक, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, कलाकार आणि इतर जणांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणी कोणताही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. त्या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे परिमंडळ 9 चे पोलीस उपायुक्त दीक्षित गेंडाम यांनी सांगितले.