कोलकात्यामध्ये आर. जी. कर राज्य सरकारी रुग्णालयात एका 31 वर्षीय डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याविरोधात बलात्कार व खुनाचा गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने आरोपीला 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे.
रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये डॉक्टर तरुणीचा मृतदेह आढळला होता. चौकशी अहवालानुसार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मृतदेहावर अनेक जखमा दिसत होत्या. तसेच मृतदेहावर अर्धवट कपडे होते. या घटनेमुळे रुग्णालयामधील डॉक्टर आणि कर्मचाऱयांनी संताप व्यक्त करत सखोल चौकशीच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन केले होते.
ईयरबडच्या तुकड्यामुळे आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
अटक केलेला आरोपी संस्थेबाहेरचा असून त्याचे रुग्णालयात नेहमी येणेजाणे होते. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेताना मृतदेहाजवळ पोलिसांना ब्लूटूथ ईयरबडचा एक छोटासा तुकडा सापडला होता. या छोटय़ाशा पुराव्याच्या आधारावर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर आरोपीची ओळख पटवली आहे.