बलात्काराच्या प्रकरणात दोषींना निर्दयीपणे शिक्षा व्हायलाच हवी! मुंबई हायकोर्ट

554

मोबाईलमध्ये गाणी दाखवण्याच्या बहाण्याने 5 वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या 29 वर्षांच्या नराधमाला दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. बलात्काराच्या प्रकरणांमध्ये दोषींना कठोरात कठोर आणि निर्दयीपणे शिक्षा व्हायलाच हवी, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी आरोपीचा अपील अर्ज फेटाळून लावला. एवढेच नव्हे तर अशा व्यक्ती या सुसंस्कृत समाजासाठी धोकादायक असतात, असे निरीक्षणही न्यायमूर्तींनी नोंदवले.

ठाणे जिह्यात राहणाऱ्या या आरोपीने एप्रिल 2015 साली शेजारच्या 5 वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये गाणी दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व तिच्यावर अत्याचार केले. ही घटना शेजाऱ्यांना कळताच शेजारच्यांनी आरोपीच्या घरी धाव घेत त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. तसेच घडला प्रसंग मुलीच्या घरच्यांना सांगितला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गंभीर कृत्याची दखल घेत सत्र न्यायालयाने जून 2018 साली आरोपीला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले.

अशा व्यक्ती समाजासाठी घातकच

न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर या अपील अर्जावर सुनावणी घेण्यात आली. अशा व्यक्ती समाजासाठी घातक असतात आणि म्हणूनच आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, हे असे एक प्रकरण आहे ज्यामध्ये अपीलकर्त्याच्या सुधारणांचा प्रश्नच उद्भवत नाही कारण आरोपीचे वय पाहता त्याच्या कृत्याचे दुष्परिणाम त्याला माहीत होते असे हायकोर्टाने स्पष्ट केले व न्यायमूर्तींनी दिलासा देण्यास नकार देत आरोपीचा अर्ज फेटाळून लावला.

आपली प्रतिक्रिया द्या