13 वर्षांच्या बलात्कार पीडितेने मागितली गर्भपातासाठी परवानगी, न्यायालयाने विनंती फेटाळली

493
प्रातिनिधिक फोटो

अहमदाबादमधील सत्र न्यायालयापुढे 13 वर्षांच्या बलात्कार पीडितेने गर्भपाताची परवानगी मिळावी यासाठी याचिका केली होती. तिच्यावर मामाने बलात्कार केला होता. बलात्कारामुळे गर्भवती राहिलेल्या या पीडितेच्या आईने न्यायालयात याचिका दाखल करत गर्भपात करण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली होती. गर्भपातासंबंधीच्या विधेयक संसदेत प्रलंबित असल्याने आणि वैद्यकीय कारणांचा हवाला देत न्यायालयाने पीडितेची विनंती फेटाळली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद कालोत्रा यांनी निर्णय देताना म्हटले की वैद्यकीय सल्ला असे सांगतो की पीडिता ही 22 आठवड्यांची गर्भवती आहे. तिचा गर्भपात करायचा असेल तर शस्त्रक्रिया करावी लागू शकते. सध्याच्या कायद्यानुसार 20 आठवड्यांपर्यंतच्या गर्भवतीला गर्भपातासाठीची परवानगी देता येऊ शकते. सध्या संसदेमध्ये एक विधेयक प्रलंबित असून या विधेयकानुसार 24 आठवड्यांपर्यंतचा गर्भ पाडता येऊ शकतो. या दोन बाबी लक्षात घेतल्यानंतर न्यायाधीशांनी गर्भपाताला परवानगी नाकारली.

गर्भवती मुलीच्या आईने न्यायालयाला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला की ही मुलगी अवघ्या 13 वर्षांची असून मातृत्वासाठी ती अजून खूप लहान आहे. या मुलीचं भविष्य सुरक्षित करायचे असेल तर तिचा गर्भपात करणं गरजेचं आहे. मुलीची तब्येत पाहता तिची प्रसुती करणं हे धोकादायक ठरू शकतं, यामुळे तिच्या गर्भपाताची परवानगी देण्यात यावी. मात्र या मातेची विनंती न्यायालयाने नामंजूर केली.

आपली प्रतिक्रिया द्या