साखर कारखाना चालू करण्यासाठी किल्लारी येथे रास्ता रोको

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । किल्लारी

किल्लारी येथील शेतकरी सहकारी साखर कारखाना या गळीत हंगामात शासनाने चालू करावा, या मागणीसाठी बुधवारी किल्लारी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

किल्लारीपाटी येथे शेतकरी साखर कारखान्याच्या गेटवर लातूर उमरगा रोडवर रास्ता रोको करण्यात आला. औसा, निलंगा, उमरगा तालुक्यातील अनेक शेतकरी ऊस उत्पादक व्यापारी मोठ्या प्रमाणात या रास्ता रोकोत सामील झाले होते. कारखाना बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली एक तास हा रास्ता रोको करण्यात आला. महाराष्ट्रात सर्वात कमी कर्ज असलेल्या या कारखान्याची निविदा लवकरात लवकर काढून  किंवा शासनाने तरी कारखाना चालू करावा. तालुक्यातील आमदार, खासदार तसेच पालकमंत्री यांनी याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर यापुढील आंदोलन लोकप्रतिनिधींच्या घरासमोर केला जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी दिला. यावेळी सचिन पाटील, अशोक पोतदार, नानाराव भोसले, प्रकाश पाटील, गुंडाप्पा बिराजदार, विजयकुमार सोनवणे यांनी आपली मते मांडली. शेवटी तहसिलच्या वतीने नायब तहसीलदार शिवाजीराव कदम, पेशकार संपत माने, तलाठी व्यंकट पवार यांनी निवेदन स्वीकारले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

यावेळी किल्लारी दिलीप लोहार, रमेश हेळंबे, गुलाब शिंदे, शरद भोसले, किरण बाबळसुरे, सुरज बाबळसुरे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.