
विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका रुग्णालयात मोठय़ा प्रमाणात उंदीर आणि घुशींचा वावर आहे. तसेच अस्वच्छतेमुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पालिका आयुक्तांना पत्र लिहीत या समस्यांकडे लक्ष वेधले असून रुग्णालयातील गैरसोयी दूर करण्याची मागणी पत्राद्वारे केली.
शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू यांनी नुकतीच विलेपार्ले येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. आर. एन. कूपर महानगरपालिका जनरल रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी रुग्णालयातील अस्वच्छता आणि उंदीर-घुशींचा सातत्याने वावर असल्याची तक्रार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी सुनील प्रभू यांच्याकडे केली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली.
रुग्णालयाच्या अपघात विभागाजवळ पुरेशी आसन व्यवस्था असली तरी येथे मोठय़ा प्रमाणात भटक्या कुत्र्यांचा वावर असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना त्रास होत आहे. रुग्णालयात वेळेत साफसफाई होत नसल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. अस्वच्छतेमुळे रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुनील प्रभू यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहीत रुग्णालयातील समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. तसेच रुग्णालयातील गैरसोयी तत्काळ दूर करण्याची मागणी केली आहे.