उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि विस्तारा या तिन्ही विमान कंपन्यांनी त्यांना मानवंदना दिली. तसेच गुंतवणूकदारांनीही टाटा उद्योगसमुहावर विश्वास दाखवल्याने या उद्योगसमुहाच्या हवाई सेवेसह इतर शेअर्समध्येही तेजी दिसून आली. उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर गुरुवारी एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस आणि विस्तारा या तिन्ही विमान कंपन्यांनी त्यांना मानवंदना दिली. या तिन्ही कंपन्यांच्या विमान प्रवासादरम्यान रतन टाटा यांच्या कार्याचे स्मरण करणारी माहिती देण्यात येत होती.
रतन टाटा यांनी टाटा उद्योगसमुहाला वेगळ्याच उंचीवर नेले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे उद्योगसमुहाने अनेक महत्त्वाचे टप्पे गाठले. मी योग्य किंवा अयोग्य असे ठवून निर्णय घेत नाही, मी आधी निर्णय घेतो आणि नंतर तो योग्य ठरवतो, असे रतन टाटा म्हणाले होते. ते त्यांनी अनेक गोष्टीत सिद्ध करून दाखवले. रतन टाटा आणि टाटा समूह यांच्यातील अतूट संबंधामुळे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळतील, असा अनेकांचा अंदाज होता. मात्र, गुंतवणूकदारांनी टाटा उद्योगसमुहावर विश्वास कायम ठेवल्याने त्यांच्या बहुतांश कंपन्यांचे शेअर्स वधारले.
सुरुवातीला टाटा इन्व्हेस्टमेंट, टाटा मोटर्स, टीसीएस, टाटा स्टील, टाटा पॉवर, टायटन इत्यादी कंपन्यांचे शेअर्स वधारले. गुंतवणूकदारांनी टाटा समूहावर विश्वास कायम ठेवत एक प्रकारे रतन टाटा यांना आदरांजलीच अर्पण केली.
रतन टाटा यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी झारखंडमध्ये गुरुवारी एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात आला. माझ्या मृत्यूनंतरही कंपनीतील काम सुरू ठेवा, अशी रतन टाटा यांची इच्छा होती. त्यामुळे पिंपरी आणि चिंचवडमधील टाटा मोटर्सच्या कामगारांनी गुरुवारी कंपनी सुरू ठेवून त्यांना आदरांजली वाहिली.