रेशनचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा प्रयत्न हाणून पाडला, नगर तहसील कार्यालयाची कारवाई

872

कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नागरिकांना स्वस्त धान्य दुकानांमधून उपलब्ध करुन दिले जाणारे धान्य काळ्या बाजारात विक्रीचा प्रयत्न नगर तहसील कार्यालयाच्या पथकाने हाणून पाडला. 8 एप्रिल रोजी म्हणजेच बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बोल्हेगाव येथे ही कारवाई करण्यात आली. पथकाने 40 गोण्या धान्यासह ट्रॅक्टर जप्त केला असून, सदरचे स्वस्त धान्य दुकान सील करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तहसीलदार उमेश पाटील यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणाच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल केला जाईल, असे पुरवठा विभागाचे अधिकारी प्रदीप पवार यांनी सांगितले.

बुधवारी रात्री बोल्हेगाव येथील गोपाळ कृष्णा कळमकर यांच्या बोल्हेगाव येथील स्वस्त धान्य दुकानातून प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांसाठी देण्यात आलेले धान्य अवैधपणे गोण्यांमध्ये भरून ट्रॅक्टरने काळ्या बाजारात घेऊन जात असल्याबाबतची माहिती तहसीलदार उमेश पाटील यांना मिळाली होती. त्यांनी माहितीची शहानिशा करुन खात्री पटल्यानंतर नागापूरचे मंडल अधिकारी श्रीनिवास आव्हाड यांच्या पथकाला सूचना देऊन बोल्हेगाव येथे कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच एमआयडीसी व तोफखाना पोलिसांनाही सूचना दिल्या. मंडल अधिकारी आव्हाड, नांदगावचे तलाठी श्री. बेलेकर व नवनागापूरचे तलाठी श्री. भापकर यांनी कारवाई करुन सदरचा माल व ट्रॅक्टर जप्त केला. तसेच सदरचे स्वस्त धान्य दुकान सील करण्याचे आदेशही तहसीलदार पाटील यांनी दिले आहेत. तसेच संबंधितांविरोधात कायदेशीर फिर्याद देण्याचे निर्देशही दिले आहेत. पकडलेले वाहन व माल पुरवठा विभागाच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्यामार्फत पुढील कारवाई होईल, असेही तहसीलदार पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या