गरीबांच्या हक्काच्या धान्यावर प्रशासन-पुरवठा विभागाचा संगनमताने डल्ला

46

विजय जोशी । नांदेड

वेगवेगळ्या चांगल्या योजना यशस्वीरित्या मार्गी लावल्यानेच प्रशासनाचा नांदेड पॅटर्न नावारुपास आला. मात्र जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागाने अन्नधान्याचा केलेला घोटाळा व त्यात वापरलेल्या वेगवेगळ्या युक्त्या यामुळे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आगळावेगळाच पॅटर्न जिल्ह्यात उदयास आला आहे. गोरगरीबांच्या हक्काच्या धान्यावर प्रशासन-पुरवठा विभाग व त्यांचे अधिकारी संगनमताने कशा पध्दतीने डल्ला मारत होते, याचा अहवालच पोलीस प्रशासनाने विभागीय आयुक्तांना सादर केला असून, यामुळे वितरण व्यवस्थेला खाली मान घालावी लागली आहे.

कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्याला सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे धान्य काळ्या बाजारातून पुरविले जात असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर आता पुरवठा विभाग आणि जिल्हा प्रशासनाने उडवाउडवीची उत्तरे देवून उलट स्वस्त धान्य दुकानदारांनाच वेठीस धरण्याचा प्रकार सुरु केला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणारे सहायक पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी तेरा पानांचा अहवाल विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असून, यात भयानक बाबी समोर आल्या आहेत.

गोरगरीबांना अन्नधान्य मोफत देण्याच्या शासनाच्या विविध योजना अंतर्गत नांदेडच्या  पुरवठा विभागामार्फत विविध गोदामातून अन्नधान्य साठविले गेले. मोठा गाजावाजा करुन biometric thumb शिवाय कुणालाही धान्याचे वितरण केले जात नाही, असा पारदर्शी कारभार आमच्याकडे सुरु आहे, असा गाजावाजा पुरवठा विभागाने केला होता. मात्र यातील गौडबंगाल नांदेड पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले. जवळपास दोन कोटी रुपयांचे धान्य वेगवेगळ्या ट्रकमध्ये जात असताना पोलिसांनी ते पकडले. विशेष म्हणजे पोते देखील बदलण्याची काळजी संबंधितांनी घेतली नाही.

घटनेपूर्वी पंधरा दिवस पोलिसांनी या प्रकरणाचा अभ्यास केला तसेच गोदाम व अन्य ठिकाणी खासगी वेषातील पोलीस लावून यातील सत्य बाहेर आणले. जिल्हा पोलीस अधीक्षक व त्यांची टिम कारखान्यात असताना बाहेर एका पोलीस निरीक्षकाच्या मदतीने चार ट्रक सोडून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. याचीही माहिती पोलीस घेत आहेत. या संबंध प्रकरणाचा तेरा पानी अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सादर केला असून, जीपीआरएसव्दारे या सर्व धान्यांची मोजणी झालेली असताना सदरचे धान्य काळ्याबाजारात कोणाच्या मार्फत न्यायला लावले, याचीही माहिती यात देण्यात आली आहे. या प्रकरणातील पकडण्यात आलेल्या चालकांना विश्वासात घेवून अनेक प्रकरणाची माहिती  पोलिसांनी घेतली आहे. मात्र त्याबद्दल पोलीस अद्यापही गप्प आहेत. यातील अनेक बाबी रंजक तसेच चालबाजीने महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तसेच परराज्यात देखील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे धान्य अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने अधिकाऱ्यांच्या आशिर्वादाने जात होते. याचाही तपास पोलीस करीत आहेत.  हे प्रकरण आता अन्न व पुरवठा विभागाकडे गेले असून थेट मुख्यमंत्र्यांकडे देखील याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या