एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार, गणपतीबाप्पा मोरयाच्या जयघोषात उद्या गणपतीबाप्पांचे वाजतगाजत आगमन होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 लाख 66 हजार 986 घरगुती आणि 116 सार्वजनिक गणेशोत्सवाच्या गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने गावी दाखल झाले आहेत. कोकण रेल्वेच्या गाड्यांना तुडूंब गर्दी आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांना ट्रॅफिक जामचा फटका बसला आहे.
कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. घरोघरी गणपतीबाप्पांच्त्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. घरत्त्या गणपतीसाठी चाकरमानी गावी आले आहेत. गेले दोनतीन दिवस गणपती सजावटीच्या कामात भाविक व्यस्त होते, उद्या सकाळी वाजतगाजत गणपतीबाप्पांचे आगमन होणार आहे. त्यानंतर गणपतीबाप्पा विराजमान होऊन त्याची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. दररोज घरांमध्ये गणपतीबाप्पांची पुजाअर्चा आणि आरत्यांमुळे मंगलमय वातावरण निर्माण होणार आहे, रत्नागिरी तालुक्यामध्ये 27 हजार 584 गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. संगमेश्वर तालुक्यात 26 हजार 045 गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. राजापूरमध्ये 27 हजार 955 गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. लांजामध्ये 13 हजार 540 गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. चिपळूणमध्ये 32 हजार 835 गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. गुहागरमध्ये 14 हजार 462 गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. खेडमध्ये 13 हजार 757 गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. दापोलीमध्ये 7 हजार 845 गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. मंडणगडमध्ये 3 हजार 660 गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. घरगुती गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही जय्यत तयारी केली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विविध कार्यक्रमांचे, सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
कोकण रेल्वेने गणेशभक्तांसाठी 300 जादा गाड्या सोडल्या असल्या तरी अनेक गणेशभक्त वेटींगवरच प्रवास करत आहेत. कोकण रेल्वेच्या गाड्यांना प्रचंड गर्दी झाली आहे. एसटी महामंडळाच्याही 4 हजार 800 बस गणेशभक्तांसाठी सोडण्यात आल्या आहेत. चाकरमान्यांची गर्दी पाहून खासगी गाड्यांनीही अवाच्या सव्वा तिकीट दर आकारले आहेत.