
दुर्गेश आखाडे । रत्नागिरी
केंद्रीय नगरविकास खात्याकडून स्वच्छ शहरांचे सर्वेक्षण करण्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ या मोहिमेत रत्नागिरी नगर परिषदेने हिंदुस्थानात चाळीसावा, राज्यात चोविसावा आणि पश्चिम हिंदुस्थानात सव्वीसावा क्रमांक पटकावला आहे.
केंद्रीय नगरविकास खात्याने फेब्रुवारी, मार्च महिन्यात संपूर्ण हिंदुस्थानातील शहरांचा सर्व्हे करून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ हे अभियान राबवले होते. या अभियानाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. एक लाख लोकसंख्येच्या प्रवर्गात रत्नागिरी नगर परिषदेने बाजी मारली असून हिंदुस्थानात चाळीसावा क्रमांक पटकावला आहे. पश्चिम हिंदुस्थानमध्ये (राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, दीव, दमण, गोवा, महाराष्ट्र) रत्नागिरी नगर परिषदेने सव्वीसावा आणि महाराष्ट्र राज्यात चोविसावा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे रत्नागिरी नगर परिषद ५ कोटींच्या बक्षिसाला पात्र ठरली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना उद्युक्त करावे यासाठी केंद्र शासनाने देशातील ४०४१ स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छतेच्या अंगाने मूल्यमापन केले होते. त्यात रत्नागिरी नगर परिषदेने उत्तम कामगिरी करत हे यश संपादन केले आहे. ‘हे यश नागरिकांचे असून त्यांच्या सहकार्यामुळे मिळाले आहे. रत्नागिरीतील प्रत्येक नागरिकांचा या यशात मोलाचा वाटा आहे’ अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी व्यक्त केली असून सर्व नागरिकांचे अभिनंदन केले आहे.

























































