प्रेयसीचा मारेकरी निघाला सिरीयल किलर, दुर्वास पाटीलने आणखी दोन खून केल्याचे पोलीस तपासात निष्पण्ण

खंडाळ येथील सायली देशी बार चालक दुर्वास दर्शन पाटील हा तीन खून करून मोकाट फिरत होता. 16 ऑगस्ट रोजी दुर्वास पाटील याने त्याची प्रेयसी भक्ती मयेकर हिचा वायरने गळा आवळून खून करून तिचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला. बेपत्ता झालेल्या भक्तीचा शोध घेताना तिचा प्रियकर दुर्वासला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केल्यानंतर खूनाची कबुली दिली. पोलीस तपासात त्याने वर्षभरापूर्वी त्याच्या बारमध्ये काम करणाऱ्या राकेश जंगम याचाही गळा आवळून खून करून मृतदेह आंबा घाटातील दरीत टाकल्याचे उघडकीस आले. राकेश जंगम याचा खून का केला याचा तपास सुरू असताना दुर्वासने कळझोंडी गावातील ५५ वर्षीय सीताराम वीर यांना केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.

29 एप्रिल 24 रोजी सकाळी सीताराम वीर हे दुर्वास पाटीलच्या बार मध्ये दारू पिण्यासाठी आले होते. दुर्वासची मैत्रीण भक्ती हिला सीताराम वीर फोन वर बोलून त्रास देतात या रागाने दुर्वास पाटील,विश्वास पवार आणि राकेश जंगम यांनी बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. सीताराम वीर यांना चक्कर आल्याचे खोटं सांगून रिक्षाने घरी पाठवले. 6 जून 2024 रोजी रात्री 11 वाजता कपड्यांची बॅग घेऊन येतो सांगून घराबाहेर पडलेला राकेश जंगम बेपत्ता झाला. कोल्हापूरला जायचे सांगून राकेशला सोबत नेत दुर्वास पाटील,विश्वास पवार आणि नीलेश भिंगार्डे या तिघांनी त्याचा गळा आवळून खून केला. त्याचा मृतदेह आंबा घाटातील दरीत फेकून दिला.भक्ती मयेकर हिच्या खूनानंतर दुर्वास पाटीलने केलेले आणखी दोन खून उघडकीस आले आहेत.