
पाणीटंचाईमुळे दिड-दोन किलोमीटर अंतराचा प्रवास करून मोटरसायकलवरून पाण्याची पिंप भरून आणून ते पाणी शेतात सोडावे लागत होते. अखेर त्या शेतकऱ्याने शेतात कोकण जलकुंड उभारले. आज त्या जलकुंडात ५२ हजार लीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्या पाणी साठ्यांवर काजूबागेला जीवदान मिळाले आहे.
कोकणात डिसेंबर महिन्यानंतर पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होते. त्यामुळे पावसाच्या पाण्यावरच शेती करण्याचा अनेकांचा कल असतो. पुढे सहा महिने पाण्याअभावी ही जमीन पडून रहाते. इच्छाशक्ती असून शेतकऱ्यांना पाण्याअभावी शेतात राबता येत नाही. पाण्याअभावी नारळ,आंबा आणि काजू बागायतींचे नुकसान होते अशावेळी कोकण जलकुंड रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीसाठी संजीवनी ठरू शकते.
चिपळूण तालुक्यातील तालुक्यातील ढोकवली येथील युवा शेतकरी राजेंद्र धाकटू गावकर यांने कोकण जलकुंडचा प्रयोग यशस्वी केला आहे. ढोकवली गावातील काजूबागेला पाणी उपलब्ध करण्यासाठी राजेंद्र गावकर यांना वणवण भटकावे लागत होते. त्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील कोकण जलकुंड योजनेतून एक जलकुंड मंजूर करून घेत शेतात जलकुंड उभारले. प्रत्येकी पाच मीटर लांबी,पाच मीटर रुंदी आणि २ मीटर खोली ठेवून जलकुंडाची उभारणी केली जाते. २५ गुंठे जमिनीमागे एक जलकुंड मंजूर केले जाते. राजेंद्र गावकर यांनी त्यांच्या शेतात एक जलकुंड उभारले आहे त्यामध्ये आता ५२ हजार लीटर पाण्याचा साठा तयार झाला आहे.हे पाणी ते काजू बागायतीसाठी वापरतात.
पूर्वी आम्ही मोटरसायकलवरून पिंप भरून पाणी आणायचो आता कोकण जलकुंडमुळे शेतातच पाणी उपलब्ध झाले आहे. या पाण्यामुळे माझ्या काजू बागेला जीवदान मिळाले आहे
राजेंद्र गावकर, शेतकरी,ढोकवली चिपळूण