
रोजगाराची सुवर्णसंधी अशी जाहिरातबाजी करत अनेकांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या आरजू टेकसोल कंपनीच्या संचालकांविरुद्ध न्यायालयात 15 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
आरजू टेकसोल कंपनीचे संचालक प्रसाद शशिकांत फडके, संजय विश्नाथ सावंत, संजय गोविंद केळकर व (नजरेआड आरोपी क्र. 4) अमन महादेव जाधव ऊर्फ ॲनी अशी त्यांची नावे आहेत. आरजू कंपनीने रोजगाराची सुवर्णसंधी अशा आशयाची जाहिरातबाजी पेपरमध्ये तसेच पॅम्पलेट वाटून केली होती. त्यानंतर अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. ही रक्कम 6 कोटी 36 लाख 60 हजार 182 एवढी होती; मात्र परतावा देण्याची वेळ आल्यानंतर कंपनीने आपला गाशा गुंडाळला होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गुंतवणूकदारांनी थेट पोलीस ठाणे गाठत यासंदर्भात माहिती दिली.
त्यानंतर मे महिन्यात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात 23 मे 2024 गुन्हा दाखल करण्यात आला होता. 578 फिर्यादी व साक्षीदार यांची रुपयांची फसवणूक केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले. या सदर गुन्ह्यातील कंपनीचे संचालक प्रसाद फडके, संजय सावंत, संजय केळकर यांना अटक केले असून, मागील 2 महिन्यांपासून हे सर्व न्यायालयीन कोठडीत आहेत व फरारी आरोपी क्र. 4 अमन महादेव जाधव ऊर्फ ॲनी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318 (4), 316 (2), 3 (5) तत्सम भा.दं.वि. कलम 420, 406, 34 महाराष्ट्र ठेविदारांच्या (वित्तिय संस्थामधील हितसंबंधांचे संरंक्षण) अधिनियम 1999 चे कलम 3 व 4 प्रमाणे गुन्हा केल्याचे तपासामध्ये सबळ पुरावा प्राप्त करून मुदतीत अतिरीक्त सत्र न्यायालय, रत्नागिरी येथे 25 जुलै 2024 रोजी सुमारे 15 हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड, उप-अधीक्षक, मुख्यालय श्रीम. राधिका फडके यांच्या मार्गदर्शनाखाली निळकंठ बगळे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे, शाखा, रत्नागिरी व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास केला आहे.