
ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आवळल्या आहेत. त्यांच्याकडील 11 ग्रॅम वजनाच्या ब्राऊन हेरॉईनच्या 175 पुड्या जप्त करण्यात आल्या असून दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्ला ते राजिवडा रस्त्यावर बुड्ये मोहल्ला येथे दोन व्यक्ती संशयास्पद हालचाली करताना आढळून आल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे ब्राऊन हेरॉईन या अंमली पदार्थाच्या 175 पुड्या सापडल्या. पोलिसांनी 11 ग्रॅम वजनाचे ब्राऊन हेरॉईन आणि इतर साहित्य असा 90 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी मोहसीन नूरमोहम्मद फणसोपकर आणि मुस्तकीम युसुफ मुल्ला यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि त्यांच्या पथकाने केली.