
विकासकामांचे केवळ भूमिपूजन करून स्वत:चा ढोल वाजवणाऱ्या महायुती सरकारने ठेकेदारांवर उपासमारीची वेळ आणली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ठेकेदारांची गेल्या दोन वर्षांतील सुमारे 700 कोटी रुपयांची देयके थकवली आहेत. आज (04-07-2025) रत्नागिरी जिल्ह्यातील ठेकेदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. तात्काळ आमची देयके काढा आता जगायचं कसं? हा आमच्या समोर प्रश्न निर्माण झाल्याचे ठेकेदारांनी सांगितले.
ठेकेदारांनी शुक्रवारी निवासी जिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांना निवेदन दिले. या निवेदनात ठेकेदारांनी आपल्या व्यथा मांडल्या. गेल्या दोन वर्षात कामाची देयके मिळाली नाहीत. तीन वर्षांपूर्वी केलेल्या कामांची 10 ते 15 टक्के पैसे मिळाले. गेल्या वर्षभरात केलेल्या कामांचे मार्चमध्ये फक्त 5 ते 10 टक्के पैसे मिळाले. यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे ठेकेदारांनी सांगितले. यावेळी सुरेश चिपळूणकर, शैलेश कदम, सुनील जाधव, गणेश कांबळे, रणजीत डांगे, राम नार्वेकर, राजू खेडकर, सचिन रेडीज व इतर ठेकेदार उपस्थित होते.
‘वरून पैसे नाही आले’… अधिकाऱ्यांनी उत्तरे
देयके मिळालेली नसल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडतो. त्यावेळी ‘कामे करा’ असा तगादा लावतात. विकासकामाच्या देयकाबाबत विचारणा केली असता ‘वरून पैसे आले नाहीत आम्ही काय करणार’ अशी उत्तरे देतात. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील इतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 525 कोटी रुपये आणि सार्वजनिक बांधकामच्या चिपळूण विभागाकडे 210 कोटी रूपये अशी एकूण 725 कोटी रुपयांची देयके थकली आहेत, असे ठेकेदारांनी सांगितले.
बॅंक आम्हाला उभं करत नाही – सुरेश चिपळूणकर
ठेकेदार संघटनेच्या आंदोलनाचे प्रमुख सुरेश चिपळूणकर यांनी ठेकेदाराच्या देयकाचे 725 कोटी रुपये थकल्यामुळे आमचा जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांचे पगार थकले आहेत, बॅंकांच्या कर्जाचे हफ्ते थकले आहेत. दुसऱ्या कर्जासाठी बॅंक आम्हाला उभे करत नाही. त्यामुळे राज्य सरकारने किमान थकीत रक्कमेच्या 50 टक्के रक्कम तातडीने द्यावी, अशी मागणी सुरेश चिपळूणकर यांनी केली.