Sindhudurg News – चार तोळे सोने व बाईकच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ, गर्भपातही केला; पती व सासू-सासऱ्यांना अटक

पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहितेच आत्महत्येच प्रकरण ताज असतानाच आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महिलांवर सासरच्यांकडून होणाऱ्या मानसिक व शारीरिक छळाची एक एक प्रकरण समोर येत आहेत. देवगड तालुक्यातून असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चार तोळे सोने व बाईकच्या मागणीसाठी विवाहितेचा मानसिक व शारिरीक छळ करून तिच्या संमत्तीशिवाय तिचा एका खासगी रुग्णालयात गर्भपात केल्याच उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पती, सासू आणि सासरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.  दरम्यान, या घटनेतील संशयित रामदास अनभवणे हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित साक्षी हिचा संशयित सागर अनभवणे (32) याच्याशी 16 फेब्रुवारी 2020 रोजी प्रेमविवाह झाला होता. मात्र, त्यांच्या प्रेमविवाहाला सागरचे वडील रामदास अनभवणे (62) व आई रोहिणी (61) यांचा विरोध होता. परंतु, सागरने समजूत काढल्यानंतर त्यांनी विवाहास मान्यता दिली होती. लग्नाच्यावेळी पती सागरला दोन तोळ्याची सोन्याची चेन देण्याचा अट्टाहास सासरच्या मंडळींनी साक्षीच्या माहेरच्या मंडळींकडे केला होता. परंतु साक्षीच्या माहेरच्या मंडळींना आर्थिकदृष्ट्या ते शक्य झाले नाही.

लग्नानंतर पती सागर, सासरे रामदास, सासू रोहिणी या संशयितांनी साक्षी हिच्या आईकडे चार तोळे सोने व मोटरसायकल देण्याची मागणी केली व मागणीच्या पूर्ततेसाठी पती व सासू सासऱ्यांनी साक्षीला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच साक्षी ही अडीच महिन्यांची गरोदर असताना तिच्या इच्छेविरुद्ध पती सागर याने तिचा एका खासगी रुग्णालयात नेऊन गर्भपात केला. याप्रकरणी साक्षी हिने देवगड पोलीस स्थानकात संशयित पती सागर, सासरे रामदास अनभवणे, सासू रोहिणी या संशयितांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. हा सर्व प्रकार 16 फेब्रुवारी 2020 ते 9 नोव्हेंबर 2024 या काळात घडला आहे. या फिर्यादीनुसार देवगड पोलिसांनी तीनही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 89, 85, 316 (2), 115 (2), 352, 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगाडे करीत आहेत.