
दापोली तालुक्यातील कळंबट गावात बीएसएनएल (BSNL) कंपनीने मोबाईल टॉवर उभा केला खरा, मात्र प्रत्यक्षात या टॉवरचा लाभ ग्राहकांना मिळत नसल्याचे चित्र आहे. ‘टॉवर गावाला अन् रेंज नाही नावाला…’ अशी अवस्था कळंबटसह परिसरातील गावांची झाली असून, मोबाईलधारक नेट कनेक्टिव्हिटीअभावी पूर्णपणे हैराण झाले आहेत.
सध्याच्या युगात मोबाईल आणि इंटरनेट जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, ग्रामीण भागात कनेक्टिव्हिटी मिळत नसल्याने अनेक महत्त्वाची कामे रखडली आहेत. इंटरनेटअभावी शासकीय कामे, बँकिंग व व्यवहार, स्वस्त धान्य दुकान आणि शिक्षण या क्षेत्रांवर मोठा परिणाम होत आहे:
गावात टॉवर असूनही नेट चालत नसल्याने ग्राहकांचा संताप अनावर होत आहे. अनेक नागरिक महागड्या किमतीचे रिचार्ज करतात, परंतु नेटवर्कअभावी ते रिचार्ज कोणत्याही उपयोगाविना वाया जात आहे. जर चुकून रेंज मिळालीच, तर समोरच्या व्यक्तीचा आवाज स्पष्ट ऐकू येत नाही, अशा तक्रारी नागरिक करत आहेत. व्यावसायिक माहिती, शेअर बाजार, प्रवासाचे बुकिंग आणि नातेवाईकांशी संपर्क साधणे यांसारख्या साध्या गोष्टींसाठीही कळंबटवासीयांना कसरत करावी लागत आहे. बीएसएनएल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन टॉवरची तांत्रिक क्षमता सुधारावी आणि अखंडित सेवा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.



























































