
संगमेश्वर तालुक्यातील मेढे गावातील सावंतवाडी येथे मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना टळली. गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने दरड कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रवीण धोंडू साळवी यांच्या घरावर दरड कोसळल्याने मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने घरात कोणी नसल्यामुळे जीवितहानी टळली.
प्रवीण साळवी आणि त्यांची पत्नी सोमवारी रत्नागिरीला गेले होते. त्यामुळे दरड कोसळली तेव्हा घर बंद होते. दरड कोसळताना प्रचंड आवाज झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आणि घटनास्थळी धाव घेतली. बंद घर पाहून त्यांनी सुटकेचा निश्वास टाकला. या दुर्घटनेत घराचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तत्काळ पुनर्वसनासाठी प्रयत्न करावेत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
धामणीतील देवशेताची लावणी संपन्न
संगमेश्वर तालुक्यातील धामणी स्वयंभू बाजीदेवाच्या शेताची भातलावणी संपन्न झाली. गावकरी एकत्र येऊन एकोपा जोपासून दरवर्षी ही लावणी करत असतात. सोबत लावणीचे भल्लरीगीत, गरमागरम चहा तसेच तिखट मसालेदार आमटी भात असे नियोजन करण्यात आले होते.