
थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना विना अट कर्जमाफी मिळावी. यंदाच्या हंगामात पाऊस पडल्यामुळे आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळावी. माकडांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते, त्यामुळे माकडांचा बंदोबस्त करावा. पीक विम्याचा लाभ मिळण्यासाठी विम्याचे निकष बदलावे, अशा मागण्या आंबा बागायतदारांनी जिल्हाधिकारी यांच्यासमोर निवेदनाद्वारे मांडल्या. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
आंबा बागायतदारांनी दिलेल्या निवेदनात विविध मागण्या मागितल्या आहेत. त्यामध्ये २०२४-२५ वर्षाकरिता फळपीक विम्यासाठी ई-पीक पहाणीची अट रद्द करावी. महावितरणच्या स्मार्ट मीटरला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे स्मार्ट मीटर बसवू नयेत. आंबा,काजू,नारळ आणि सुपारीच्या पीकांना हमी भाव मिळावा. खते आणि औषधे सवलतीच्या दरात मिळावीत, अशी मागणी करण्यात आली. यावेळी कोकण हापूस आंबा उत्पादक आणि उत्पादक विक्रेते सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश साळवी, अशोक भाटकर, दीपक उपळेकर, सुयोग आंग्रे, किरण तोडणकर, अनंत आंग्रे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, उपतालुकाप्रमुख विजय देसाई, शहर प्रमुख प्रशांत सांळुखे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.





























































