
जिल्ह्यात गेले काही दिवस बीएसएनएल सेवेचा बोजवारा उडाला आहे. अनेक टॉवर बंद अवस्थेत आहेत. त्याविरोधात शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) 22 मे रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन छेडणार आहे. शिवसैनिक बीएसएनएलच्या कार्यालयावर धडक देणार आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विनायक राऊत खासदार असताना त्यांनी अनेक मोबाईल टॉवर मंजूर केले होते, तसेच बीएसएनएलच्या सुविधाही सुधारल्या होत्या. मात्र, आता अनेक गावांतील मंजूर टॉवरची कामे रखडली आहेत आणि बीएसएनएलची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक टॉवर नादुरुस्त अवस्थेत बंद आहेत. या पार्श्वभूमीवर माजी खासदार विनायक राऊत यांनी बीएसएनएल कार्यालयाला जाग येण्यासाठी स्वतः उपस्थित राहून जाब विचारण्याचा निर्णय घेतला आहे.