
कारखाना नाही आमचा जीव मोठा, कारखाना बंद नाहीतर आंदोलन तीव्र, लोटे एमआयडीसीतील लक्ष्मी ऑर्गेनिक इंडस्ट्रीज़मधील पीफास हे घातक उत्पादन बंद झालेच पाहिजे, अशा जोरदार घोषणा देत आज लक्ष्मी ऑर्गेनिकच्या विरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. कोकण नागरी संघर्ष समिती, लोटे पंचक्रोशी पर्यावरण संघर्ष समिती, जन आक्रोश समिती यांनी एकत्र येऊन प्रशासनाला आणि सरकारला जाग आणण्यासाठी आज हा मोर्चा काढला.
इटलीमध्ये यापूर्वी एक दुर्घटना घडली होती. तेथील मिटेनी पंपनीमध्ये पीफास या रसायनाची निर्मिती केली जात होती. मात्र त्या प्रक्रियेच्या दरम्यान तयार होणारे टाकाऊ रासायनिक सांडपाणी योग्य प्रक्रिया न करता थेट नदीत सोडून दिले होते. पाणी दूषित होऊन सुमारे तीन ते चार हजार लोकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर असला घातक प्रकल्प आमच्या निसर्गरम्य कोकणात आणून इथले मानवी जीवन उद्ध्वस्त करून कोकणचा निसर्ग धोक्यात आणण्याचा प्रयत्न सरकार का करत आहे असा सवाल उपस्थित करण्यात आला.
हा मोर्चा मुंबई गोवा महामार्गावरील एक्सल फाटा येथून निघाला.पोलिसांनी आज कडक बंदोबस्त ठेवला होता.लक्ष्मी ऑर्गेनिक पंपनीपासून 500 मीटर अंतरावरच हा मोर्चा थांबवण्यात आला होता.याठिकाणी पोहचल्यानंतर आंदोलकांनी जोरदार निदर्शने करत सरकारचा निषेध केला.
लक्ष्मी ऑर्गेनिक पंपनीत पीफास रसायनाच्या निर्मितीमधून प्रक्रियेदरम्यान दुर्घटना घडल्यास कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ किंवा पेंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ इतकेच काय तर सरकारकडेसुद्धा कायदा अस्तित्वात नाही. अशावेळी भविष्यात काही दुर्घटना घडली तर या कारखान्यावर कारवाई कोण करणार असा संतप्त सवाल आंदोलकांनी विचारला.
यावेळी अशोक जाधव, उदय घाग, कांचन चाळके, रवींद्र गोवळकर, अविनाश आंबे, दिलीप घाग, सचिन चाळके, संजय चाळके, पं.स. सदस्य अजय चाळके, मनसे दक्षिण रत्नागिरी संपर्क उपाध्यक्ष मनीष पात्रे, महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना खेड तालुका अध्यक्ष मंगेश चाळके, आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासह इतरही अनेक संघटना आणि शेकडो कोकणवासीय महिला आणि पुरुष आंदोलक उपस्थित होते.


























































