Ratnagiri News – भर पावसात मासेमारीसाठी गेले अन् नदीपात्रात अडकले, अथक प्रयत्नानंतर वाचवण्यात यश

भर पावसात मासेमारीसाठी गेलेले तिघेजण नदीपात्रात अडकल्याची घटना चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे रविवारी (25 मे 2025) रात्री उशिरा घडली होती. या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासन रेस्क्यू टीमने बचावकार्य करत तिघांना वाचवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष वसंत पवार (40), पत्नी सुरेखा संतोष पवार (35) त्यांचा पुतण्या ओंकार रवी पवार (17) हे तीघे मौजे पिंपळी खुर्द सोनारवाडी येथील नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते. परंतु अचानक पाणी वाढल्याने ते नदीपात्रातच अडकले. घटनेची माहिती मिळताच महसूल, पोलीस, नगर परिषद, आरोग्य विभाग, महानिर्मिती आणि आपदा मित्र घटनास्थळी दाखल झाले. चिपळूणचे प्रांत अधिकारी आकाश लिगाडे यांना या घटनेची माहिती समजताच त्यांनी तातडीने पाणी थांबवण्याच्या सूचना दिल्या. रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य करण्यात आलं आणि अथक प्रयत्नानंतर तिघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. चिपळून रेस्क्यू टीम या तिघांसाठी देवदूत ठरली आहे.

पिंपळी येथील हे चौघेही जण अडकल्याने प्रचंड घाबरले होते त्यामुळे वैद्यकीय पथकही तैनात ठेवण्यात आलं होतं. सगळ्या रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. चिपळूण पोलीस, महसूल अग्निशमन दल नगरपरिषद यंत्रणा आदी घटनास्थळी होत्या. अडकलेल्या चौघांना बाहेर काढण्यासाठी चिपळूण येथील रेस्क्यू टीमने शर्थीचे प्रयत्न केले. घटनास्थळी चिपळूणचे पीआय मेंगडे दाखल झाले होते. रविवारी रात्री उशिरा मान्सून दाखल झाल्याच्या पहिल्याच दिवशी चिपळूण तालुका रेस्क्यू टीमचं टीमवर्क पाहायला मिळाल. चिपळूण तालुक्यातील पिंपळी येथील नदीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एक अल्पवयीन मुलगा, महिला व इसमाला तब्बल चार तासानंतर सुरक्षित बाहेर काढण्यात आले. महसूल, पोलीस, नगरपालिका, वैद्यकीय विभाग, महानिर्मिती व आपदा मित्र यांचे एकत्रित टीमवर्कचे चिपळूण तालुक्यातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.