जिल्ह्यात पावसाने आज पुनरागमन केले. मुसळधार पावसाने रत्नागिरीकरांना झोडपून काढले आहे. मात्र पावसाच्या पुनरागमनामुळे राजापूर तालुक्यातील अणुस्कूरा घाटामध्ये पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे घाटातील वाहतूक ठप्प झाली. बांधकाम विभाग दरड हटविण्याचे काम युध्दपातळीवर करत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणामुळे मुंबईतून कोकणात येणारी वाहने पुणे मार्गे अणुस्कूरा घाटातून कोकणात येण्याला पसंती देताना दिसत आहेत. त्याचबरोबर गोव्याला जाणार्या पर्यटकांकडूनही याच रस्त्याला प्राधान्य दिले जात आहे. त्यातून, नागमोड्या वळणांचा आणि उताराचा असलेल्या अणुस्कूरा घाटमार्गातून सातत्याने मोठ्याप्रमाणात वाहनांची वर्दळ असते. असे असताना आज पहाटे 5 च्या दरम्यान घाटामध्ये दरड कोसळली. त्यामध्ये मातीच्या ढिगार्यासह मोठमोठे दगड रस्त्यामध्ये आल्याने रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.
दरम्यान, बंद झालेला घाटमार्ग मोकळा करण्यासाठी सकाळपासून बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील बावधनकर आणि सहकार्यांकडून तत्काळ प्रयत्न सुरू करण्यात आले. जेसीबी आणि तीन डंपरच्या सहाय्याने माती बाजूला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मातीच्या ढिगार्याखाली मोठमोठे दगड असल्याने रस्ता पूर्णपणे मोकळा करण्यामध्ये अडथळे येत आहे. रस्त्यामध्ये आलेले दगड वेळप्रसंगी ब्रेकरच्या सहाय्याने फोडण्यात येणार असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, सायंकाळी उशीरापर्यंत घाटरस्ता वाहतूकीसाठी मोकळा झालेला नव्हता. त्यामुळे अणुस्कूरा घाटमार्ग गेल्या अकरा तासापासून वाहतूकीसाठी बंद आहे.