
सावर्डे बाजारपेठेत अपघाताच्या कारणावरून एका 20 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गाडीच्या नुकसानीची रक्कम मिळेपर्यंत तरुणाला सोडणार नाही, अशी धमकी देत संशयितांनी नातेवाईकांकडून आतापर्यंत हजारो रुपये उकळले असून आणखी सव्वा लाख रुपयांची मागणी केली आहे. याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील महिलेने दिलेल्या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी मुंबईतील चौघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मेघा मारुती शिंगरे (49, रा. बिडलीनगर, कणकवली) यांचा मुलगा सिद्धेश मारुती शिंगरे हा 3 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सावर्डे बाजारपेठेतून जात असताना त्याचा आरोपींच्या गाडीशी अपघात झाला होता. या अपघातात झालेल्या गाडीच्या नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी आरोपी तेजस गायकवाड, शुभम गायकवाड, राजू गायकवाड आणि विनोद टक्के (सर्व रा. मुंबई) यांनी सिद्धेशला जबरदस्तीने आपल्यासोबत नेले. त्याला एका ठिकाणी बंदिस्त करून ठेवत आरोपींनी त्याच्या नातेवाईकांकडे पैशांची मागणी सुरू केली.
सिद्धेशच्या सुटकेसाठी आरोपींनी आधी 18 हजार मग 25-25 हजार रक्कम उकळली. मात्र, इतके पैसे देऊनही सिद्धेशला न सोडता आरोपींनी आता उर्वरित 1 लाख 25 हजार रुपयांची मागणी केली असून, ‘पैसे द्या आणि मुलाला घेऊन जा’ अशी धमकी दिली आहे. आपला मुलगा परत न आल्याने अखेर मेघा शिंगरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून सावर्डे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मुंबईतील संशयित आरोपींचा शोध घेतला जात आहे.




























































