
टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 489 धावांची भक्कम धावसंख्या उभी केली आहे. मुथुसामीने केलेल्या 109 धावांच्या शतकीये खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 400 हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला. प्रत्युत्तरात टीम इंडियाने आपल्या दुसऱ्या डावात 36 षटकांचा खेळ संपला तेव्हा 4 गड्यांच्या मोबदल्यात 102 धावा केल्या आहेत. दरम्यान, टीम इंडियाचे माजी खेळाडू रवी शास्त्री यांनी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला अनोखा सल्ला दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाला मालिका जिंकायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत सामना जिंकावा लागेल. अन्यथा दक्षिण आफ्रिका सामन्यासह मालिका सुद्धा जिंकेल. रवी शास्त्री स्टार स्पोर्ट्शी बोलताना म्हणाले की, “हिंदुस्थानी फलंदाजांनी पहिल्या डावात जास्त वेळ न घालवता वेगाने धावसंख्या उभी केली पाहिजे. तसेच गरज पडल्यास दक्षिण आफ्रिकेने केलेल्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा कमी धावांमध्ये टीम इंडियाने आपला डाव घोषित केला पाहिजे. यामुळे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या डावात कमी धावसंख्येवर सर्वबाद करून लक्ष्य निश्चित करू शकेल.” असा सल्ला रवी शास्त्री यांनी टीम इंडियाला दिला आहे.
रवी शास्त्रींनी टीम इंडियाला दिलेल्या सल्ल्याचा विचार करता अशा प्रकारचा प्रयोग टीम इंडियाने आतापर्यंत 4 वेळा केला. जेव्हा टीम इंडियाने विरुद्ध संघाच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा कमी धावांमध्ये आपला पहिला डाव घोषित केला. परंतु हा प्रयोग टीम इंडियाच्याच अंगलट आल्याचे चित्र आहे. कारण संघाला चारपैकी एकाही सामन्यात जिंकता आले नाही. चारपैकी तीन सामने अनिर्णीत सुटले तर एका सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

























































