
चेक बाऊन्स होण्याचे प्रमाण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत नियमात महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्यानुसार आता चेक बाऊन्स झाल्यास बँकांना आपल्या ग्राहकांना 24 तासांच्या आत एसएमएस किंवा ईमेलद्वारे कळवावे लागणार आहे.
ग्राहकांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या ग्राहक भारती या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेनंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने याप्रकरणी ठोस पाऊल उचलले. नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट सेक्सन 138 नुसार दाखल होणाऱ्या गुह्यांचे प्रमाण कमी करून चेक बाऊन्सच्या घटना हाताळण्यासाठी यंत्रणा सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे. सध्या डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाली असली तरीही चेक बाऊन्सचे प्रमाण मोठे असल्याचे समोर आले आहे.