यूपीआयवरून 10 हजार रुपये पाठवल्यास तासभर वाट पहा, डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी आरबीआयचा नियम लागू होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) डिजिटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी नवा नियम लागू करू शकते. नव्या नियमानुसार यूपीआयद्वारे पेमेंट करताना ते पूर्ण होण्यासाठी तासाभराचा वेळ लागू शकतो. डिजिटल फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी आरबीआय 10 हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे यूपीआय किंवा डिजिटल ट्रान्सफरचे व्यवहार पूर्ण होण्यासाठी एक तासाची वाट पाहावी लागू शकते. या दरम्यान ग्राहकाला संबंधित व्यवहार रद्द करण्याची संधीदेखील असेल.

आरबीआयच्या मते फसवणुकीचे प्रकार तांत्रिक नसतात. फसवणूक करणारे लोक पह्न का@ल किंवा मेसेज करून भीती दाखवून किंवा आमिष दाखवून स्वतःच्या खात्यात पैसे वर्ग करून घेतात. दरम्यानच्या काळात थोडा वेळ देण्यात आल्यास लोक विचारपूर्वक निर्णय घेऊ शकतात. म्हणजे डिजिटल फसवणूक प्रकार रोखले जाऊ शकतात.

फसवणूक वाढली

देशात डिजिटल फसवणुकीचे गुन्हे वेगाने वाढलेले आहेत. आकडेवारीनुसार 2021मध्ये डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणांची संख्या 2.6 लाख इतकी होती. 2025मध्ये ती वाढून 28 लाख झाली आहे. 2021मध्ये डिजिटल फसवणुकीच्या प्रकरणातील रक्कम 551 कोटी रुपये होती ती वाढून 22931 कोटी रुपये झाली आहे.

सूचना मागवल्या

आरबीआयच्या नव्या सुधारणांचा वापर फसवणुकीचे प्रकार रोखण्यासाठी होणार असला तरी यूपीआयच्या त्वरित पेमेंटच्या प्रक्रियेचा वेळ वाढू शकतो. काही जणांना ही यंत्रणा गैरसोयीची वाटू शकते. मात्र आरबीआयने यावर नागरिकांकडून आणि संस्थांकडून 8 मे 2026पर्यंत सूचना मागवल्या आहेत. आरबीआय त्यानंतर अंतिम निर्णय घेईल.