रियलमीचा सेल्फी मिरर फीचर असलेला हिंदुस्थानातील पहिला फोन लॉन्च, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्मार्टफोन जगतात आपली पकड मजबूत करत रियलमीने आपला नवीन ‘रियलमी 16 5जी’ हा हँडसेट हिंदुस्थानी बाजारपेठेत लॉन्च केला आहे. अत्यंत आकर्षक फीचर्स आणि नाविन्यपूर्ण डिझाइन असलेल्या या फोनचे मुख्य आकर्षण म्हणजे यातील 7000 mAh ची अवाढव्य बॅटरी आणि मागील कॅमेऱ्याजवळ दिलेला खास ‘सेल्फी मिरर’. हा फोन एअर ब्लॅक आणि एअर व्हाईट अशा दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे.

हिंदुस्थानी ग्राहकांसाठी हा फोन तीन वेगवेगळ्या स्टोरेज व्हेरिएंटमध्ये असून 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 31,999 रुपये, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेजची किंमत 33,999 रुपये, तर 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज असलेल्या टॉप मॉडेलची किंमत 36,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. या फोनच्या उपलब्धतेबाबतची अधिक माहिती 5 एप्रिलपासून फ्लिपकार्ट आणि रियलमीच्या अधिकृत वेबसाइटवर पाहायला मिळेल.

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्य म्हणजे यात 6.57 इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 4200 नीट्सच्या पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो, ज्यामुळे उन्हातही स्क्रीन स्पष्ट दिसते. वेगवान कामगिरीसाठी यात मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 टर्बो प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. फोन जास्त गरम होऊ नये यासाठी यात 6050 चौरस मिमीचे मोठे व्हेपर चेंबर कूलिंग सिस्टीम दिले आहे. विशेष म्हणजे धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या फोनला आयपी69 (IP69) रेटिंग मिळाले आहे.

फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा मुख्य ऑटोफोकस कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर आहे. या कॅमेरा सेटअपच्या बाजूला एक छोटा आरसा म्हणजेच ‘सेल्फी मिरर’ दिला आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते मागील कॅमेऱ्याचा वापर करून स्वतःचे फोटो काढताना फ्रेम पाहू शकतात. याशिवाय समोरच्या बाजूला 50 मेगापिक्सलचा दर्जेदार सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला दीर्घकाळ सुरू ठेवण्यासाठी 7000 mAh ची बॅटरी असून ती 60W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगला सपोर्ट करते.