डीम्ड कन्व्हेअन्समध्ये सुधारणा करण्याची शिफारस, स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाचा अहवाल सादर

स्वयंपुनर्विकास, समूह पुनर्विकासात झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प, सेस व नॉन सेसच्या इमारतींचा विकासदेखील यामध्ये करावा व डीम्ड कन्वेयन्समध्ये सुधारणा करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस यासंदर्भात स्थापन केलेल्या अभ्यासगटाने सरकारला केली आहे.

सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास-समूह स्वयंपुनर्विकास अभ्यासगटाचा अहवाल शासनास सादर करण्याबाबत विधान भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, सभापती प्रा.राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशीष शेलार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, काwशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार प्रवीण दरेकर, सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास- समूह स्वयंपुनर्विकास अभ्यास गटाचे सदस्य उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई जिल्हा बँकेने उत्स्फूर्तपणे सहकारी गृहनिर्माण संस्थांचा विकास केला. पण 1600 सहकारी गृहनिर्माण संस्थांनी पुनर्विकासासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे यांचा विकास करण्यासाठी पतपुरवठय़ाची आवश्यकता लक्षात घेऊन पतपुरवठय़ासाठीदेखील या अभ्यास गटाने शिफारशी केल्या आहेत. सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या सभासदांसाठी मार्गदर्शक सूचनादेखील आहेत.

फसवणूक टाळण्यासाठी

गृहनिर्माण संस्थाची पुनर्विकास करताना होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. सन 2019 मध्ये स्वयंपुनर्विकास ही संकल्पना मांडली गेली. सहकारी गृहनिर्माण संस्थाच्या संमेलनात सुमारे 19 मागण्या मांडल्या होत्या. त्यातील सुमारे 18 मागण्या पूर्ण करून गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासासाठी जीआर काढण्यात आला होता; पण त्यामध्ये अजून सुधारणा करण्याची गरज भासल्याने आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली 24 एप्रिल 2025 रोजी अभ्यास गट स्थापन केला होता. या अभ्यास गटाने सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास-समूह स्वयंपुनर्विकासासाठी अत्यंत अभ्यासपूर्ण व माहितीपूर्ण शिफारशी केल्या आहेत.