करवीरनगरीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या ऐतिहासिक संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीस आजपासून सुरुवात झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने सकाळी सातच्या सुमारास उगवत्या सूर्याच्या साक्षीने पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते कामास सुरुवात झाली. लोकांच्या भावना या ऐतिहासिक इमारतीच्या कणाकणात असल्याने हे नाट्यगृह पुन्हा दीड वर्षात दिमाखात उभे राहील, याची ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
संस्थान काळात शंभर वर्षांपूर्वी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून रोमच्या धर्तीवर पॅलेस थिएटर आणि ओपन थिएटर अर्थात छत्रपती शाहू महाराज खासबाग कुस्ती मैदानाची निर्मिती झाली. कालांतराने कोल्हापूरचेच सुपुत्र संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नाव या पॅलेस थिएटरला देण्यात आले. कोल्हापूरचे सांस्कृतिक वैभव म्हणून ख्याती असलेले हे नाट्यगृह संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला 8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या आगीत भस्मसात झाले. जनता आणि कलाकारांच्या भावना तीव्र असल्याने तातडीने हे नाट्यगृह जसेच्या तसे पुन्हा उभे राहण्यासाठी चळवळ सुरू झाली. त्यामुळे प्रशासनाकडूनही याबाबत धावपळ सुरू झाली होती. त्यानुसार आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीच आज या नाटय़गृहाच्या पुनर्बांधणीस सुरुवात झाली.
यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्यासह आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, सिनेअभिनेते आनंद काळे, व्ही. बी. पाटील, ठेकेदार वेणुगोपाल, श्रीनिवासन यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, नाट्यकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाटय़गृहाच्या दुरुस्तीला तातडीने सुरुवात झाल्याचे समाधान
– खासदार शाहू महाराज छत्रपती
– खासदार छत्रपती शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूर शहरातील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह दुर्दैवी आगीच्या घटनेत जळून खाक झाले. नाटय़गृह पुन्हा उभारणीचे काम अतिशय जलद आणि वेळेत सुरू होत आहे याचे समाधान आहे. सर्वांच्या भावना घेऊन हे काम पुढे जाईल आणि दीड वर्षाच्या आत नाट्यगृहात पुन्हा कार्यक्रमांना सुरुवात होईल. पुनर्बांधणीसाठी स्थापन केलेल्या सुकाणू समितीने चांगली साथ दिल्याचे सांगून सर्वांनी लक्ष दिल्यानेच हे नाट्यगृह उभारणीचे काम गतीने सुरू झाल्याचे त्यांनी सांगितले. नाट्यगृहाची इमारत शासनाची असून, तिची जबाबदारी त्यांनी प्राधान्याने घ्यावी, असेही ते पुढे म्हणाले.