
पावसाळ्यात अनेकदा किल्ले रायगडावर कडेतून मातीचा ढिगारा पायरी मार्गावर येतो. यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या आदेशाने पावसाळ्यात हा मार्ग शिवभक्त तसेच पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आता रेड आणि ऑरेंज अलर्ट असेल तरच किल्ले रायगडचा पायरी मार्ग बंद राहणार असून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश जारी केले आहेत. त्यामुळे शिवभक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या निर्णयामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला होता, गडाच्या पायथ्याशी व्यवसाय करणाऱ्या स्थानिक उद्योजकांचेही नुकसान झाले होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश जारी केला. त्यानुसार केवळ रेड किंवा ऑरेंज अलर्टच्या दिवशीच पायरी मार्ग बंद राहील. इतर सर्व दिवशी हा मार्ग खुला असेल.
पोलिसांनी बॅरिकेडिंग हटवले
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर महाड तालुका पोलिसांनी पायरी मार्गावर लावलेले बॅरिकेडिंग हटवले. त्यामुळे पुन्हा एकदा पर्यटकांना पायऱ्यांनी रायगड सर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या वेळी गडावर उपस्थित पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला. पर्यटन व स्थानिक रोजगाराच्या दृष्टीने हा निर्णय स्वागतार्ह असून पर्यटकांनीही गड चढताना आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.