सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास, ‘म्हाडा’तर्फे कन्स्ट्रक्शन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सीची नियुक्ती

जीटीबी नगर शीव कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींचा पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. म्हाडातर्फे निविदा प्रक्रिया राबवून मे. किस्टोन रिअलटर्स (रुस्तुमजी ग्रूप) यांची कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुनर्विकासामुळे येथे राहणाऱ्या 1200 रहिवाशांना प्रत्येकी 635 चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळणार आहे.

सुमारे 11.20 एकर जागेवर पसरलेल्या जीटीबी नगर वसाहतीतील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारती 2020 मध्ये पालिकेने धोकादायक जाहीर केल्याने पाडण्यात आल्या. त्यामुळे रहिवाशांना अन्यत्र स्थलांतरित व्हावे लागले. रहिवाशांच्या मागणीनुसार खासगी जमिनीवरील हा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला. या इमारतींचा पुनर्विकास म्हाडामार्फत कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नेमून विनियम 33 (9) अंतर्गत करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता मिळाली. त्यानंतर 23 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार या पुनर्विकास प्रकल्पासाठी ‘म्हाडा’ला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून मान्यता देण्यात आली. त्यानुसार म्हाडाने निविदा प्रक्रिया राबवली.

म्हाडाला 25,700 चौरस मीटरचा गृहसाठा

प्रकल्प पूर्ण होईपर्यंत रहिवाशांना दरमहा 20 हजार रुपये भाडे तसेच पुनर्विकासानंतर येथील रहिवाशांना पाच वर्षे देखभाल शुल्क म्हाडातर्फे दिले जाणार आहे. तसेच या पुनर्विकास प्रकल्पामुळे ‘म्हाडा’ला 25,700 चौरस मीटर क्षेत्रफळ गृहसाठा म्हणून मिळणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली.

मास्टर प्लॅन बनवण्याच्या सूचना

‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोमवारी विकासकाला स्वीकृती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी संजीव जयस्वाल म्हणाले, खासगी जमिनीवर असलेल्या या इमारतींचा म्हाडामार्फत पुनर्विकास केला जाणार असून हा एक ऐतिहासिक, पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे. या प्रकल्पाकरिता संबंधित एजन्सीला मास्टर प्लॅन बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच या गृहनिर्माण संस्थांमधील 5 ते 7 सदस्यांची एक समिती स्थापन करावी, जेणेकरून या प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा वेळोवेळी घेता येईल.