दारूविक्रीच्या दुकानांवरील देवीदेवतांची आणि राष्ट्रपुरुषांची नावे हटवण्याचे निर्देश राज्य शासनाने पाच वर्षांपूर्वी दिले होते; परंतु आजही मुंबईमधील 65 मदिरालयांना देवीदेवतांची नावे आहेत. मिंधे सरकारचा उत्पादन शुल्क विभाग अशा बारमालकांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. इतकेच नव्हे तर, हा कारवाईचा आदेशच रद्द करण्याची शिफारस उत्पादन शुल्क विभागाने सरकारकडे केली असल्याचे माहितीच्या अधिकारातून उघड झाले आहे.
दारूविक्रीची दुकाने, बीअर बार यांना देण्यात आलेली देवीदेवता, राष्ट्रपुरूष, संत, गडकिल्ले यांची नावे बदलण्यात यावीत असे निर्देश राज्य शासनाने 4 जून 2019 रोजी दिले होते. मात्र 5 वर्षे झाली तरी मुंबईतील 318 पैकी 208 म्हणजे 65 टक्के दुकानांना देवता आणि राष्ट्रपुरुष यांची नावे असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे.
दारू दुकाने आणि बार यांची नावे बदलण्यासाठी अनेक शासकीय विभागांकडे पत्रव्यवहार करावा लागतो. त्यामुळे कमी कालावधीत ही कारवाई शक्य नाही. परिणामी हा आदेशच रद्द करावा आणि नवीन नावे देताना श्रद्धास्थानांची नावे न देण्याचे उत्पादन शुल्क विभागाने सुचवले आहे.
…अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू
बारमालकांची वकिली करणाऱया उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱयांवर शासनाने कठोर कारवाई करावी, दारू दुकाने आणि बीयर बार यांना दिलेली देवता, राष्ट्रपुरुष आणि गड-किल्ले यांची नावे त्वरित बदलण्यात यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा हिंदू जनजागृती समितीने दिला आहे. हिंदू जनजागृती समितीने मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांच्याकडे यासंदर्भात लेखी तक्रार केली आहे. तसेच उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदनही दिले आहे.