अद्भुत! जिओचा ग्लास!! घराघरात व्हिडीओ कॉन्फरिंसग, थ्रीडी क्लासरूम

रिलायन्स इंडस्ट्रीजने डिजिटल विश्वात आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. रिलायन्सचा ‘जिओ ग्लास’ आज लॉन्च करण्यात आला. हा एक 75 ग्रॅम वजनाचा अत्याधुनिक चष्मा आहे. त्याद्वारे एकाच वेळी दोन जणांशी व्हिडियो कॉलिंग करता येऊ शकते. विशेष म्हणजे संवाद साधताना समोरच्या व्यक्तीची डिजिटल थ्रीडी होलोग्राफिक प्रतिमाही पाहता येणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी विविध घोषणा केल्या. त्यात ‘जिओ ग्लास’ हे नवे उत्पादनही त्यांनी सादर केले. जिओ ग्लासला आपण स्मार्टफोनशीही कनेक्ट करू शकतो. त्यासाठी फक्त एक केबल जोडावी लागेल. जिओ ग्लासमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना व्हर्च्युअल थ्रीडी क्लासरुमच्या माध्यमातून संवाद साधता येणार आहे.

  • हा चष्मा ऑगस्टपर्यंत बाजारात उपलब्ध होईल आणि त्याची किंमत सुमारे 14 हजार रुपये असू शकेल
  • ‘जिओ मीट’ हा व्हिडीयो कॉन्फरन्सिंग अ‍ॅप 50 लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केला
  • विविध 25 अ‍ॅप्सचाही सपोर्ट या चष्म्याला देण्यात आला आहे.
  • 75 ग्रॅमच्या चष्म्यातून एकाच वेळी दोघांशी व्हिडीओ कॉल
  • संवाद साधणाऱ्यांची डिजिटल प्रतिमाही दिसणार
  • गुगल-जिओ आणणार स्वस्त `5 जी’ मोबाईल

जिओ प्लॅटफॉम्र्समध्ये गुगल कंपनीने 33 हजार 737 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहितीही मुकेश अंबानी यांनी यावेळी दिली. गुगल आणि जिओ मिळून स्वस्त ‘5जी’ मोबाईल फोन आणणार आहेत. गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी ट्विटरवर यासंदर्भात सांगितले की, ‘जिओ आणि गुगलच्या भागीदारीमुळे हिंदुस्थानमध्ये मोबाईल फोन नसलेल्या लाखो नागरिकांना इंटरनेट मिळू शकेल.’ जिओ-गुगल मिळून अँड्रॉईड फोनसाठी ऑपरेटिंग सिस्टम बनवणार आहेत जी पूर्णपणे स्वदेशी असू शकणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या