नऊ वर्षांपूर्वी सोलापूर जिह्यातील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याप्रकरणी माजी आमदार रमेश कदम यांच्यासह 43 जणांना उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. सोलापूर न्यायालयाने ठोठावलेल्या तुरुंगवासाच्या शिक्षेला न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांनी स्थगिती दिली व 43 आरोपींना जामीन मंजूर केला.
अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणात रमेश कदम जामीनावर तुरुंगाबाहेर आहेत. 2015 मध्ये पोलीस ठाण्यावर काढलेला मोर्चा तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सोलापूर न्यायालयाने त्यांच्यासह 72 जणांना 27 मे रोजी दोषी ठरवले आणि एक महिन्याचा तुरुंगवास ठोठावला. या शिक्षेला रमेश कदम व इतर 42 जणांनी अॅड. प्रशांत राऊळ यांच्यामार्फत उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्या अपिलावर मंगळवारी न्यायमूर्ती कोतवाल यांच्यापुढे सुनावणी झाली.
नेमके प्रकरण काय?
2015 मध्ये मोहोळ येथील उड्डाणपुलाखाली छोटय़ा व्यापाऱयांना मज्जाव करण्यासाठी प्रशासनाने जाळी लावली होती. त्यावर रमेश कदम व इतरांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता व जेसीबीद्वारे जाळी तोडली होती. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी दाखल केलेल्या गुह्याच्या खटल्यात सोलापूर न्यायालयाने रमेश कदम यांच्यासह 72 जणांना एक महिन्याचा तुरुंगवास व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला.