सातबाऱ्यावरून शेतकऱ्यांची नावे गायब; कुटुंबियांनी दिला आत्मदहनाचा इशारा

303

मागील 80 वर्षांपासूनच्या मिळकतीचे मालक, ज्यांच्या चार पिढ्यांनी जमीन कसली, त्या कुटुंबियांच्या पाचव्या पिढीची नावचं सातबारा उताऱ्यावरून गायब झाली. अचानक सातबार्‍यावरून बेदखल झालेल्या 18 कुटुंबातील सदस्यांनी अखेर सामाजिक कार्यकर्ते हरिष बेकावडे यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले असून वेळीच दखल न घेतल्यास आत्मदहनाचाही इशारा त्यांनी दिला आहे.

पेण तालुक्यातील खरोशी गावातील 18 कुटुंबांचा हा प्रश्न गेली 7 वर्षे शासनदरबारी प्रलंबित आहे. नामदेव महादेव पाटील, नारायण पोशा पाटील, गोपिनाथ महादेव पाटील, प्रकाश लक्ष्मण पाटील आणि अर्पणा अनंत गडकरी यांच्यासह इतर 14 कुटुंबे मिळून 70 सभासद आहेत. 21 सप्टेंबर 1936 ते 4 फेब्रुवारी 2012 पर्यंत सातबारावर जवळपास 80 वर्षापूर्वीपासून या सभासदांची नावे होती, ती अचानक गायब झाल्‍याने ही कुटुंबे उद्ध्वस्‍त झाली आहेत. केवळ महसूल अधिकार्‍यांच्या आणि कर्मचाऱ्याच्‍या  चुकीमुळे या कुटुंबियांना आर्थिक आणि मानसिक त्रास झाला असल्याचे उपोषणाचे नेतृत्व करणारे हरिश बेकावडे यांनी सांगितले.

मागील 7 वर्षापासून हे कुटुंबीय न्याय हक्कासाठी लढत आहे. मात्र अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी हरिश बेकावडे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. महसूल विभागाकडे दिलेल्या कागदपत्रांच्या व तक्रारीच्या आधारे सत्य परिस्थितीचा अभ्यास करून आपल्याला पूर्ववत मालकी हक्क मिळावा तसेच सातबारा व फेरफारही पूर्ववत करावे, त्यावेळचे पेणचे तहसिलदार, मंडळअधिकारी, संबंधित तलाठी यांना तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करावा, न्याय हक्कासाठी लढताना महसूली व न्यायालयीन खर्च जो झाला आहे, त्याची व्याजासहित भरपाई मिळावी या काही प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांचा समावेश आहे.

जिल्हाप्रमुख महेंद्र दळवींनी घेतली भेट

शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख महेंद्र दळवी आणि भाजपाचे दर्शन प्रभू यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

आपली प्रतिक्रिया द्या