शेती व्यवसाय धोक्यात आल्याने मराठा समाजासही आरक्षणाची गरज – अंबेकर

सामना प्रतिनिधी । जालना

राज्यात मराठा समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. हा समाज मुख्यतः शेती व्यवसायावर अवलंबून आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. त्यामुळे या समाजापुढे मुलांचे शिक्षण, लेकी-बाळींचे लग्न अशा मोठ्या समस्या  त्यांच्यापुढे निर्माण झाल्या आहेत. पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकविले. परंतु बेरोजगारी वाढल्याने नोकऱ्यांचे प्रश्न निर्माण झाले असल्याने या समाजास अरक्षणाची गरज निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले.

येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सकल मराठा क्रांती मोर्चा व मराठा समाजबांधव यांच्या वतीने १ ऑगस्टपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाकत्र्यांनासमोर ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, युवासेनेचे जगन्नाथ काकडे, तालुकाप्रमुख संतोष मोहिते, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भीमराव डोंगरे, भरत मानकर, प्रशांत वाढेकर, संतोष गाजरे यांच्यासह सकल मराठ बांधवांची उपस्थिती होती. जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर पुढे म्हणाले की, ओबीसी समाजाप्रमाणेच मराठा समाज पुर्णत: शेतीवर अवलंबून असल्याने या दोन्ही समाजांची आर्थिक  परिस्थिती सारखीच आहे. परंतु ओबीसीला आरक्षण मिळाले. काही प्रमाणात त्यांना सुविधा मिळाल्या. परंतु या समाजातील मुठभर लोक सत्ता, शेती यांच्या बळावर आर्थिक बाजू सांभाळून आहेत. परंतु बहुसंख्येने या समाजातील लोक मात्र आज दारिद्र्यात जीवन जगताना आढळून येतात. त्यामुळे या समाजासही आरक्षणाची गरज निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या