बीडीडीतील रहिवाशांना एकरकमी भाडे मिळणार; आदित्य ठाकरे यांच्या मागणीला यश

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांसाठी खूशखबर असून दुसऱया टप्प्यातही 11 महिन्यांचे भाडे एकत्रित देण्याचा निर्णय म्हाडा प्राधिकरणाने घेतला आहे. पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यावर लॉटरी पद्धतीने सोडत काढण्याचे आणि 11 महिन्यांचे भाडे एकत्रित देण्याचे आश्वासन सुरुवातीला म्हाडाने आधी दिले होते, मात्र आजतागायत लॉटरी न काढल्याने रहिवाशांमध्ये अस्थिरता पसरली आहे. तसेच रहिवाशांना यापुढे एकत्रित भाडे न देता दरमहा देण्यात येईल, अशी गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. त्याबाबत राज्य सरकारने खुलासा करून रहिवाशांमधील संभ्रम दूर करावेत, अशी मागणी नुकतीच शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली होती. अखेर या मागणीला यश आले आहे.

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प हा राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून सद्यस्थितीत वरळी, नायगाव व ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम वेगात सुरू आहे. या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत चाळीतील पात्र रहिवाशांना म्हाडाच्या संक्रमण शिबिरात गाळे उपलब्ध करून देऊन त्यांना स्थलांतरित करण्यात येते. ज्या रहिवाशांनी संक्रमण शिबिराचा पर्याय स्वीकारला नाही अशा रहिवाशांना दरमहा पंचवीस हजार रुपये भाडे म्हाडाकडून देण्यात येते. सुरुवातीला 11 महिन्यांचे एकत्रित भाडे दिल्यानंतर प्रत्येक महिन्याचे भाडे देण्याऐवजी पुन्हा एकत्रित 11 महिन्यांचे भाडे देण्यात यावे, अशी मागणी संबंधित रहिवाशांकडून करण्यात येत होती. त्यानुसार ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी या प्रस्तावाला मान्यता दिली. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांचे पुनर्वसन सदनिकांमध्ये स्थलांतरित होईपर्यंत तिन्ही चाळीतील रहिवाशांना हा निर्णय लागू असणार आहे. तसेच भाडे अदा केल्यानंतर वास्तव्याच्या कालावधीमध्ये पुढील एखाद्या महिन्याची वाढ होत असेल तर त्यानुसार भाडे अदा करण्यास मुभा दिली आहे.

वरळीतील पुनर्वसन सदनिकांची निश्चिती येत्या आठवडय़ात
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत पुनर्विकसित इमारतीच्या बांधकामाकरिता आवश्यक असलेल्या चाळींमधील पात्र गाळेधारकांना प्रकल्पात उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित पुनर्वसन इमारतींमध्ये वितरित करावयाच्या पुनर्वसन सदनिकांची निश्चिती येत्या आठवडय़ात ‘म्हाडा’तर्फे संगणकीय प्रणालीद्वारे केली जाणार आहे.