
चिपळूण शहरात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, या गंभीर प्रश्नावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आक्रमक झाली आहे. चिपळूण येथील उपकार्यकारी अभियंता कॅरमकोंडा यांना शहरातील वीज समस्येबाबत निवेदन देत तात्काळ उपाययोजनांची मागणी करण्यात आली.
सध्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षांचा काळ सुरू असताना वीज खंडित होण्यामुळे त्यांच्या अभ्यासात अडथळे निर्माण होत आहेत. तसेच अस्थमा सारख्या आजारांनी ग्रस्त रुग्ण, वयोवृद्ध नागरिक आणि लहान मुले यांना कडक उन्हाळ्यात मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले.
या निवेदनाचे नेतृत्व शहर प्रमुख सचिन कदम यांनी केले. त्यांच्या सोबत शहर सचिव प्रशांत मुळ्ये, युवा सेना शहर अधिकारी पार्थ जागृष्टे, उपशहर प्रमुख संजय रेडीज, नगरसेवक अजय भालेकर, नगरसेविका वैशाली कदम, विभाग प्रमुख सावळाराम सातपुते, कार्यकर्ते संतोष मिरगल तसेच विभाग प्रमुख परेश साळवी उपस्थित होते.यावेळी स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधातही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. नागरिकांवर कोणतीही योजना बळजबरीने लादू नये, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.दरम्यान, वारंवार होणाऱ्या वीज खंडिताचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.




























































