बीए, बी. फार्मसीसह 10 परीक्षांचे निकाल जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

मुंबई विद्यापीठाने नोव्हेंबर 2018 मध्ये घेतलेल्या तृतीय वर्ष बीए सत्र 5, बी.फार्मसी सत्र 7 व 8 आणि इतर अभ्यासक्रमाचे 7 असे एकूण 10 परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. तृतीय वर्ष बीए सत्र 5 या परीक्षेत 13,450 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर 13,236 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यातील 7,774 विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी 59.58 एवढी आहे.

विद्यापीठाने बीए सत्र 5 बरोबरच विविध परीक्षांचे 9 निकाल जाहीर केले आहेत. यात तंत्रज्ञान विद्याशाखेचे एमई केमिकल इंजि. सत्र 1, एमई इलेक्ट्रॉनिक्स इंजि. सत्र 2, एमई मेकॅनिकल इंजि. (थर्मल इंजि.) सत्र 2, एमई इलेक्ट्रीकल इंजि. (पॉवर सिस्टीम इंजि.) सत्र 2 व एमसीए सत्र 2 आणि औsषधशास्त्र (फार्मसी) सत्र 7 व 8 या दोन परीक्षांचे आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे एमएमएस (जुना अभ्यासक्रम) सत्र 4 व एमएचआरडीएम द्वितीय वर्ष सत्र 1 असे एकूण 10 निकाल जाहीर करण्यात आले. बीए व्यतिरिक्त इतर 9 परीक्षांमध्ये 2,527 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात 1,458 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

बीएचा सुधारित अभ्यासक्रम

2018-19 या शैक्षणिक वर्षापासून बीए हा अभ्यासक्रम सुधारित करण्यात आलेला आहे. तसेच पसंतीनुसार श्रेणी पद्धत (Choice base credit system) राबविण्यात आलेली आहे. बीएमध्ये भाषाविषयक, मानव्यविद्या व सामाजिक शास्त्राचे 30 विषय अंतर्भूत आहेत. यात मराठी साहित्य, इंग्रजी साहित्य, हिंदी साहित्य, गुजराथी साहित्य, उर्दू साहित्य, कन्नड साहित्य, सिंधी साहित्य, अरेबिक,  फ्रेंच, जर्मन, पंजाबी, पाली, पर्शियन, रशियन, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, भूगोल, प्राचीन भारतीय संस्कृती, वाणिज्य, गणित, स्टॅटेस्टिक्स, इस्लामिक स्टडीज, ऍन्थ्रॉपोलॉजी, शिक्षण व ग्रामीण विकास या विषयांचा समावेश आहे.

75 हजार 199 उत्तरपत्रिका 4 हजार 103 शिक्षक

तृतीय वर्ष बीएच्या परीक्षेमध्ये मूल्यांकनासाठी 75 हजार 199 उत्तरपत्रिका होत्या. या उत्तरपत्रिका 4 हजार 103 शिक्षकांनी तपासल्या आहेत. यातील 6 हजार 442 उत्तरपत्रिकांचे मॉडरेशन करण्यात आले.