नातवाला मारले म्हणून आजोबा संतापले, मग जे घडले त्याने नागपूर हादरले!

नातवाला मारले म्हणून संतापलेल्या आजोबांनी आपल्या मुलावर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. आरोपी हा सीआरएफचा सेवानिवृत्त जवान आहे. सध्या तो कुटुंबीयांसोबत नागपूरमधील चिंतामणी नगर येथे राहतात. आरोपीविरोधात अजनी पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीची परवानाधारी रायफल जप्त केली आहे.

सीआरएफमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर आरोपी एका बँकेच्या कॅश व्हॅनसाठी सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते. आरोपीला एक चार वर्षांचा नातू आहे. सोमवारी रात्री काही कारणातून आरोपीचा मुलगा आणि सून आपल्या चार वर्षाच्या मुलाला मारत होते. नातवाला मारणे आरोपीला सहन झाले नाही. यावरून आरोपीची मुलगा आणि सुनेसोबत वादावादी झाली.

वाद इतका वाढला की आरोपीने आपली परवानाधारी रायफल घेतली आणि मुलावर गोळ्याच झाडल्या. मुलाच्या पायाला ही गोळी लागली. जखमी मुलाला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. त्याची प्रकृती आता ठीक आहे.

गोळीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी अजनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी मुलाला रुग्णालयात नेले तर आरोपी बापाला अटक केली. आरोपीवर हत्येचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नातवाला मारल्याच्या रागातून आपण हे कृत्य केल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले.