
सेवानिवृत्त अधिकाऱयाला ओएसडी म्हणून पुन्हा त्याच पदावर नेमता येऊ शकेल अशा महायुती सरकारने काढलेल्या एका शासन निर्णयाच्या जोरावर मुंबई महानगरपालिकेत सेवानिवृत्तीनंतरही अनेक अधिकारी उच्च पदे बळकावून बसले आहेत. त्यामुळे इतर अधिकाऱयांना पदोन्नती मिळणे कठीण झाले आहे. वरिष्ठ अधिकाऱयांनी यावरून महापालिका आयुक्तांना लेटरबॉम्ब देत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई महापालिका आयुक्त कार्यालयामधील उपायुक्तांच्या नियुक्तीवर सहआयुक्त आणि उपायुक्त पदावर कार्यरत 17 अधिकाऱयांनी आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र धाडले आहे. या पत्रावर 15 अधिकाऱयांच्या सह्या आहेत.
आयुक्त कार्यालयातील उपायुक्त पद मागील एक ते दोन वर्षांपासून रिक्त आहे. ते पद पदोन्नतीने भरले जाते. मात्र ते त्या पद्धतीने भरले जात नसल्याने पदोन्नतीत अडचणी येत असल्याचे अधिकाऱयांनी या पत्रात म्हटले आहे.
महापालिका उपायुक्त (सुधार) म्हणून कार्यरत असलेले चंद्रशेखर चौरे हे त्याच पदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांना ओएसडी म्हणून त्याच पदावर नियुक्त करण्यात आले आहे. इतर विभागांमध्येही सेवानिवृत्त अधिकाऱयांना ओएसडी म्हणून नेमण्यात आले आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱयांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
सेवानिवृत्त अधिकारी ओएसडी म्हणून मोक्याच्या पदांवर
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा-खासदार वर्षा गायकवाड यांनी हे पत्र सोशल मीडियात पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे. महापालिकेच्या विविध खात्यांमध्ये 9 सेवानिवृत्त अधिकारी ओएसडी म्हणून मोक्याच्या पदांवर बसलेले आहेत. महापालिका आयुक्तांच्या कार्यालयातही एक सेवानिवृत्त उपायुक्त दर्जाच्या ओएसडी महाशयांनी गेल्या वर्षभरापासून खुर्ची अडवून ठेवली आहे. हे ओएसडी नेमकी कोणती ‘स्पेशल डय़ुटी’ बजावत आहेत, ज्यामुळे सरकारला त्यांना पदमुक्त करावेसे वाटत नाही? ते पण कोणासाठी आणि कोणाच्या इशाऱयावर? ही महत्त्वाची पदे नियमित पद्धतीने का भरली जात नाहीत? मोक्याच्या जागा अडवून ठेवणाऱया या निवृत्त अधिकाऱयांमुळे इतर कर्मचाऱयांवर अन्याय होतोय, असे गायकवाड यांनी म्हटले आहे.



























































