राज्य सरकारचे आदेश असतानाही मुंबई महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या सुरक्षारक्षकांना पेन्शन, सेवा उपदान आदी देणी मिळालेली नाहीत. त्यामुळे या निवृत्त कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ तर आलीच आहे, पण बरेच कर्मचारी हे कर्जबाजारी झाले आहेत. कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी तातडीने दिली नाहीत तर पालिका आयुक्तांच्या दालनासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने दिला आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या सेवेतून वयोमानानुसार अनेक सुरक्षा कर्मचारी निवृत्त झाले आहेत, मात्र निवृत्तीनंतर त्यांना मिळणारी पेन्शन, सेवा उपदान आदी देणी अजूनही मिळालेली नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घर चालवण्यासाठी हे कर्मचारी कर्ज घेत असल्यामुळे ते कर्जबाजारीही झाले आहेत. शीवच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातून निवृत्त झालेले दयानंद तेली आणि मोहन शिंदे या सुरक्षा कर्मचाऱ्यांना एक वर्षाहून अधिक काळ झाला तरी निवृत्तीनंतरचे कोणतेही फायदे मिळालेले नाहीत. हे कर्मचारी कर्जबाजारी तर आहेतच, पण त्यामुळे त्यांना शारीरिक, मानसिक आजारही झाले आहेत. डॉक्टरकडे जाऊन उपचार घेण्याइतके आणि औषधांसाठीचेही पैसे त्यांच्याकडे नाहीत. अशी अनेक प्रकरणे प्रलंबित असून त्याबाबत 20 ऑगस्टला एका बैठकीचे आयोजन करून त्यात निर्णय घ्यावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे चिटणीस रामचंद्र लिंबारे यांनी पालिकेच्या प्रमुख सुरक्षा अधिकाऱ्यांकडे केली आहे.