
नाशिकऐवजी गुजरातला भात नेऊन तांदळाचा काळाबाजार करण्यात आदिवासी विकास महामंडळ आणि पुरवठा विभागातील टोळीचे संगनमत असल्याचे समोर येत आहे. भ्रष्टाचार दडपविण्यासाठी बोगस रेकॉर्ड तयार केले असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
धान खरेदीअंतर्गत खरेदी केलेला भात हा महामंडळाच्या गोदामात साठविला जातो. कंत्राटदाराला नाशिकमधीलच मिलमध्ये भरडण्यासाठी पाठविण्याचे रेकॉर्ड हे महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या अखत्यारीत आहे. भरडाईनंतर 67 टक्के उताऱ्याप्रमाणे तांदूळ पुरवठा विभागाच्या गोदामात कंत्राटदाराकडून ताब्यात घेतला जातो. या दोन्हीही प्रक्रिया दोन्ही खात्यांशी परस्पर संबंधित आहेत. सुरगाण्यात गेलेला भात आणि त्याचा जमा झालेला तांदूळ याचा हिशेब दोन्ही विभागांना ठेवावा लागतो. काळाबाजार करताना झालेला भ्रष्टाचार दडपविण्यासाठी स्वतःच्या सोयीचे रेकॉर्ड हे दोन्ही विभाग करतात. या प्रकरणात संगनमत असल्याची चर्चा होत आहे. हा प्रकार चव्हाटय़ावर आल्यानंतर दोन्ही ठिकाणच्या हालचाल रजिस्टरच्या बनावट नोंदींची खात्री करून घेण्यासाठी संबंधित टोळीची खास बैठकही पार पडली आहे.