बदलापुरात हे काय चाललंय? कायदा-सुव्यवस्थेचा विनयभंग; रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीचा धरला हात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नामांकित शाळेतील बालिकांचे लैंगिक शोषण आणि स्कूलबसमध्ये चिमुरड्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या बदलापूरमध्ये पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला आहे. टय़ुशनला जात असताना 10 वर्षीय मुलीचा हात पकडून विकृत रिक्षाचालकाने लज्जास्पद वर्तन केले, मात्र मुलीसोबत असलेल्या मैत्रिणीने प्रसंगावधान दाखवत त्याच्या डोळ्यात माती फेकली, त्यामुळे रिक्षाचालक भिरभिरला. त्याक्षणी त्याचा हात झटकून दोघी धावत सुटल्याने पीडितेची सुटका झाली. याप्रकरणी, पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे बदलापूरमध्ये कायदा-सुव्यवस्थेचाच विनयभंग झाल्याचा संताप व्यक्त होत आहे.

n पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेऊन पैफियत मांडली. पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तत्काळ आरोपीचा शोध सुरू केला. तीन पथके आरोपीच्या मागावर होती. घटनास्थळीचे 25 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता आरोपी अंबरनाथ येथील रिक्षा चालक असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी अंबरनाथमधून आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलीस उपायुक्त सचिन गोरे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

बहाद्दर मैत्रिणीने धाडस केल्याने सुटका

बदलापूर पूर्व भागात पीडित मुलगी मैत्रिणीसोबत टय़ुशनला जात होती. त्याचवेळी विकृत रिक्षाचालकाने तिला रस्त्यात अडवले. तिचा हात धरून विनयभंग करत विकृत चाळे केले. मुलीने विरोध करूनही रिक्षाचालक तिचा हात सोडत नव्हता. अखेर तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने प्रसंगावधान राखत रिक्षा चालकाच्या डोळ्यात माती फेकली. या हल्ल्याने रिक्षाचालक गडबडला, याचा फायदा घेऊन दोघींनी तिथून पळ काढला. घाबरलेल्या मुलीने घरी जाऊन हा प्रकार सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी तत्काळ बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने आरोपीची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.