रिक्षा संघटनेने श्रमदान करत बुजविले तुरळ चिखली मार्गावरील खड्डे

सामना प्रतिनिधी । संगमेश्वर

संगमेश्वर तालुक्यातील तुरळ कडवई चिखली मार्गावर रस्त्याला पडलेले मोठे मोठे खड्डे भरण्याबाबत वारंवार मागणी करुनही सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे अखेरीस सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून येथील रिक्षा संघटनेने श्रमदान करुन सर्व खड्डे बुजवले आहेत. रिक्षा संघटनेच्या या कामगिरीचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.

तुरळ कडवई चिखली हा रस्ता मोठ्या रहदारीचा असून असंख्य वाहने दिवसभरात या मार्गावरून ये जा करीत असतात. मात्र या रस्त्याच्या डागडूजीकडे लक्षच दिले जात नसल्याने या मार्गाची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावर दुरुस्तीसाठी निधी खर्ची टाकला जातो, थातुरमातूर दुरुस्ती केल्याचे दाखवले जाते मात्र पावसाळ्यात खड्डे पडले की दुरुस्तीचे वास्तव समोर येते. याबाबत वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

येथील रिक्षा संघटनेने चार वर्षांपूर्वी आंदोलनाच्या माध्यमातून हा रस्ता दुरुस्त करुन घेतला होता. त्यानंतर चार वर्षे रस्ता सुस्थितीत होता. मात्र वाहनांची मोठी रहदारी असल्याने आणि बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. यावर्षी रिक्षा संघटनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूची साईडपट्टी दुरुस्त करण्यात आली होती. तसेच काही प्रमाणात खड्डेही भरण्यात आले होते. मात्र हे काम निकृष्ट झाल्याने याबाबतची तक्रारही बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. या तक्रारीची योग्य ती दखल घेतली गेली नाही. अखेरीस पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे पडलेच.

बांधकाम विभाग खड्डे भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून रिक्षा संघटनेने या मार्गावर पडलेले खड्डे भरुन साईडपट्ट्यांची दुरुस्ती केली तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी तोडून साफसफाई करण्यात आली. या मोहिमेत रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलींद चव्हाण, उपाध्यक्ष लक्ष्मण मयेकर, सचिव दत्ताराम ओकटे, खजिनदार रूपेश रहाटे यासह सदस्य सहभागी झाले होते. ऱिक्षा संघटनेच्या या सामाजिक उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करत धन्यवाद दिले आहेत.