
बंगळुरुतील अनिल कुंबळे सर्कलजवळ शनिवारी पहाटे लॅम्बोर्गिनी कारने केलेल्या कथित ड्रिफ्टिंग स्टंट प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. माजी अंडरवर्ल्ड डॉन मुथप्पा राय याचा मुलगा रिकी रायच्या वकिलांनी स्टंटचा दावा फेटाळून लावत ती घटना ब्रेक लावल्यामुळे झालेली घसरण असल्याचे म्हटले आहे. रिकी रायला जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे.
या घटनेचा चुकीचा अर्थ लावला गेला. घटनेवेळी गाडी रिकी राय नाही तर त्याचा चालक चालवत होता. रिकी केवळ गाडीत बसला होता, असे रिकी रायचे वकील जी. नारायणस्वामी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ती कार नुकतीच सर्व्हिस सेंटरमधून आली होती. रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्यामुळे तिथे माती पसरलेली होती. अशा परिस्थितीत चालकाने ब्रेक लावल्यामुळे कार घसरली. मात्र चालकाने कौशल्याने गाडीवर नियंत्रण मिळवले, त्याचे कौतुक व्हायला हवे, असे वकिलांनी नमूद केले.
सामान्यतः ड्रिफ्टिंग किंवा व्हीलिंगच्या प्रकरणांमध्ये पोलीस दंड वसूल करून वाहन सोडून देतात. मग या प्रकरणात एफआयआर का नोंदवला गेला? असा युक्तिवाद वकिलांनी केला आहे. रिकी रायने अटकपूर्व जामीन मिळाल्यानंतर कब्बन पार्क ट्रॅफिक पोलिसांसमोर हजर होऊन आपला जबाब नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.




























































