ब्रिटन पेटलं! लीड्समध्ये दंगल, हजारो लोकं रस्त्यावर उतरली; जाळपोळ अन् हिंसाचार, धक्कादायक Video व्हायरल

ब्रिटनच्या लीड्स शहरामध्ये दंगल उसळली आहे. गुरुवारी रात्रीपासून शहरात जाळपोळ आणि हिंसाचार सुरू असून याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लोकं मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून शहरात धुमाकूळ घालत आहेत. हिंसक झालेल्या जमावाने बसला आग लावली असून पोलिसांच्या गाडीवरही हल्ला केला आहे.

वेस्ट यॉर्कशायर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास लीड्स शहरातील हेयरहिल्स भागातील लक्झर स्ट्रीटवर लोकं जमा होण्यास सुरुवात झाली. यात काही लहान मुलांचाही समावेश होता. बघता बघता हा जमाव हिंसक झाला आणि दंगल पेटली.

दरम्यान, या दंगलीचे कारण स्थानिक बाल संगोपन संस्थेने मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे करून बाल संगोपन केंद्रात ठेवण्याचा आदेश दिला असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हजारो लोकं रस्त्यावत उतरली आणि दंगल उसळली. यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. मात्र लोकांनी पोलिसांनाही जुमानले नाही आणि त्यांच्यावरही दगडफेक केली.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काही लोकं बसला आग लावताना दिसत आहेत, तर काही लोकं घरातील कचरा रस्त्यावर टाकताना दिसत आहेत. अन्य एका व्हिडीओमध्ये लोकं मोठा फ्रिज घेऊन येतात आणि रस्त्यावर लावलेल्या आगीमध्ये त्याची होळी करतात. दंगलीमुळे येथील भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत या भागात न जाण्याचा सत्ता प्रशासनाने लोकांना दिला आहे.

दरम्यान, ब्रिटनच्या गृहमंत्री यवेट कूपर यांनीही लीड्समधील दंगलीची दखल घेतली आहे. लीड्समध्ये दंगलीचे वृत्त ऐकून धक्का बसला आहे. पोलिसांच्या वाहनांना आणि सार्वजनिक वाहनांना येथे निशाणा बनवला जात आहे. ही दृश्य धक्कादायक असून अशा विकृतींना समाजात स्थान नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत, असे कूपर यांनी सांगितले.