पंचगंगेची पाणीपातळी 36 फुटांवर; 79 बंधारे पाण्याखाली, 28 मार्ग बंद

कोल्हापूर जिह्यात सर्वत्र जोरदार पाऊस होत असून, शहरात अल्पशा विश्रांतीनंतर पावसाची संततधार सुरूच आहे. धरण पाणलोटक्षेत्रात धुवाँधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर आणि सध्या धरणांतून सुरू असलेल्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. पंचगंगेच्या पातळीत तासाला इंचाने वाढ होत असून, सायंकाळी सहाच्या सुमारास पंचगंगेची पातळी 36.4 फूट झाली होती. पावसाचा जोर वाढल्यास मध्यरात्रीच पंचगंगा 39 फुटांची इशारापातळी ओलांडण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 79 बंधारे पाण्याखाली गेले असून, पाच राज्यमार्ग, 11 प्रमुख जिल्हा मार्ग, तर 12 ग्रामीण मार्ग अशी एकूण 28 मार्गांवरील वाहतूक बंद झाली आहे.

दरम्यान, पात्राबाहेर पडलेल्या नद्या इशारापातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाल्याने पुराचे पाणी नदी आणि नालाकाठच्या वस्तीत घुसण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 29.9 मि.मी. पावसाची नेंद झाली असून, सर्वाधिक पाऊस पन्हाळा तालुक्यात 57.4 मि.मी. झाला.